नवी दिल्ली - सध्या एसआयआर प्रक्रियेवरून देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने प्रशासकीय रचनेत मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. २०२५ आणि २०२६ या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ रोजी पदभार सांभाळला. त्यानंतर गेल्या २० महिन्यांतील या बदल्या इतक्या कमी कालावधीतील अधिकार्यांच्या सर्वात मोठ्या फेरबदलांपैकी एक मानल्या जात आहेत.
एका रिपोर्टनुसार, या काळात मुख्य निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी विशेषतः उप निवडणूक आयुक्त (डीईसी) यांच्या स्तरावर अनेक महत्त्वाचे बदल झाले. गेल्या काही वर्षांत मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्याही झाल्या आहेत परंतु २०२५-२६ चा कालावधी तुलनेने अधिक जास्त बदल्यांचा होता. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या २० महिन्यांत सुमारे १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. द इकोनॉमिक्स टाइम्समध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुमारे ३३ महिन्यांच्या कार्यकाळात ज्यामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचाही समावेश होता, जवळपास २३ मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याआधीचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सुशील चंद्र यांच्या कार्यकाळात अंदाजे २९ मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. हा कालावधी लोकसभा निवडणुकांच्या काळातही होता. लोकसभा निवडणुकांच्या काळात मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्या अनेकदा होतात. मात्र, २०२५ आणि २०२६ मध्ये हे बदल अधिक वेगाने झाले.
३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदल्या
दरम्यान, प्रशासकीय सातत्य राखण्यासाठी निवडणूक आयोग सामान्यतः मुख्य निवडणूक अधिकार्याला किमान तीन वर्षांसाठी पदावर कायम ठेवतो. परंतु अलीकडील किमान सात बदल्यांमध्ये अशा अधिकार्यांचा समावेश होता ज्यांनी या पदावर दोन वर्षांपेक्षा कमी काळ सेवा बजावली होती. २०२५ मध्ये आठ ते नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर २०२६ मध्ये आतापर्यंत किमान १० अधिक बदल्या झाल्या आहेत. बिहारमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या बदल्या २०२५ मध्ये सुरू झाल्या. प्रक्रिया राबवणारे हे पहिले राज्य होते. २०२५ अखेरीस च्या दुसर्या टप्प्याच्या काही दिवस आधी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांची बदली झाली होती.
लक्षद्वीपमध्ये एका वर्षात बदलले तीन मुख्य निवडणूक अधिकारी
लक्षद्वीपमधील मुख्य निवडणूक अधिकार्यांमधील बदल विशेष होता. नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तीन वेगवेगळ्या अधिकार्यांनी हे पद भूषवले. गौरव सिंग राजवत यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांची बदली झाली. जानेवारी २०२६ मध्ये अवनीश कुमार यांनी पदभार स्वीकारला. मात्र अवनीश कुमार केवळ जुलै २०२६ पर्यंतच या पदावर राहिले. त्यानंतर ए. एस. शिवकुमार यांची लक्षद्वीपचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.